ज्येष्ठ अभिनेते-समीक्षक माधव वझे यांचे निधन   

 

पुणे : साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या ‘श्यामची आई’ या राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त चित्रपटातील श्यामची म्हणजे छोट्या साने गुरुजींची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी आणि  मुलगा अभिनेता दिग्दर्शक अमित वझे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
माधव वझे यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३९ रोजी पुण्यात झाला. वाडिया कॉलेजमधून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले होते. अभिनेता दिग्दर्शक नाट्यगुरू आणि नाट्य समीक्षक अशी ओळख असलेल्या वझे यांना राज्य नाट्य स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदक मिळाले. गोवा येथील कला आकादमीच्या नाट्य विभागामध्ये प्राध्यापक म्हणून काम केलेले होते. आंतरराष्ट्रीय नाट्य समीक्षक संघाचे सभासद होते. नाट्य संघाच्या देश परदेशातील अधिवेशनामध्ये त्यांनी शोधनबंध लिहिले होते. परशुराम देशपांडे यांनी मराठीत रूपांतर केलेल्या ‘शेक्सपियरचे हॅम्लेट’ या नाटकाचे दिग्दर्शन माधव वझे यांनी केले होते.नाटकात कनक दात्ये आणि नेहा महाजन यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या हे नाटक २०१३ मध्ये रंगमंचावर आले होते. माधव वझे यांनी डियर जिंदगी, थ्री इडीयट्स अशा चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या रंगमुद्रा या ग्रंथाला राज्य पुरस्कार मिळाला होता. भारतीय व पाश्चात्य प्रथितयश नाटककारांच्या नाटकांच्या प्रयोगाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. आंतरराष्ट्रीय नाट्य समीक्षक संघाचे ते सभासद होते.
 

Related Articles